Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक समुदायाला केले आवाहन; म्हणाले..

इस्लामाबाद : लोकशाही, मानवी हक्क आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने, विशेषतः अमेरिकेने आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करावी, असे आवाहन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. ‘ईम मासिकामध्ये लिहीलेल्या एका लेखामध्ये इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष होण्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पाकिस्तानबरोबरची आर्थिक भागीदारी अधिक भक्कम करण्यासाठी स्थैर्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघर्ष,कट्टरतावाद निर्माण होईल अशा वातावरणाला रोखण्यासाठी अमेरिका काम करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. हा लेख जरी इम्रान खान यांच्या नावेने प्रसिद्ध झाला असला, तरी तो प्रत्यक्ष्यात इम्रान खान यांनीच लिहीला आहे का आणि हा लेख इम्रान यांनी मासिकापर्यंत पोचवला तरी कसा हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आपल्याला तुरुंगात टाकले जाणे आणि आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. लोकशाही मूल्यांचा पाठपुरावा आपण करत असल्यामुळेच हे आरोप ठेवले गेल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. .
पाकिस्तानात राजकीय गोंधळाची स्थिती असून लोकशाहीसाठीचा संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक काळ आहे. आपला संघर्ष हा वैयक्तिक नसून लोकशाहीसाठी आहे. केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर प्रदेशासाठी आणि जागतिक स्थैर्यासाठीही या संघर्षाचे दूरगामी परिणाम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दहशतवादविरोधी उपाययोजनांंचा वापर राजकीय सूडासाठी केला जात असल्याची टीकाही त्यांनी सरकारवर केली.





