करोनाने प्रत्येक गावात १० मृत्यू; योगी सरकारच्या कारभारावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचीच टीका

बलिया – उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कोविड हाताळणीच्या पद्धतीवर भारतीय जनता पक्षाच्याच एका नेत्याने जाहीर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पहिल्या लाटेपासून योगी सरकारने काहीच धडा घेतला नाही, त्याचा मोठा फटका या राज्याला दुसऱ्या लाटेत बसला आहे.
या राज्यातील प्रत्येक गावात किमान दहा जण करोनामुळे मरण पावले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. राम इकबाल सिंह असे या ज्येष्ठ भाजप नेत्याचे नाव असून, ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत.
आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याच सरकारवर ही टीका केली. ते म्हणाले की, करोनामुळे मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. बलियासारख्या जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांच्या काळानंतरही डॉक्टर्स व वैद्यकीय सेवेचा व औषधांचा अभाव आहे.
योगींनी बलिया जिल्ह्याचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी या जिल्ह्यातील उत्तम आरोग्य व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले होते, याकडे राम इकबाल यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती सांगून त्यांची दिशाभूल केली आहे. शेतकरी अडचणीत असल्याचाही दावा त्यांनी केला व शेतकऱ्यांना डीझेल सबसिडी मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.





