माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे कार अपघातात निधन

लातूर : बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे लातूर-तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर हा अपघात घडला, ज्यामध्ये त्यांची कार स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडत चार वेळा पलटी खात खाली कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बीड आणि लातूर परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेड येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचा कार्यक्रम अर्धवट सोडून लातूरकडे धाव घेतली. त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉ. किनीकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. माजी आमदार देशमुख हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय सहकारी होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने मुंडे कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांनी फेसबुकवर पोस्ट करत शोक व्यक्त केला. “माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय आर. टी. देशमुख (जीजा) यांच्या अपघाती निधनाने बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली,” असे त्यांनी म्हटले.




