माजी आमदार, चार नगरसेवकांसह 41 जणांना जामीन

पुणे(प्रतिनिधी) – महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि चार नगरसेवकांसह 41 जणांना सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
या प्रकरणातील सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. प्रसाद कुलकर्णी, अॅड. के. टी. आरु, अॅड. शैलेश म्हस्के, अॅड. रवी लाढाणे, अॅड. ऋषिकेश घोरपडे आणि अॅड. सिद्धार्थ राठोड यांनी काम पाहिले
माजी आमदार टिळेकर यांच्यासह सर्वांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांनुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, ऋषाली कामठे, वीरसेन जगताप अशी अटक झालेल्या नगरसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी कार्यकारी अभियंता अषित देवप्रकाश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
प्रकरणात संबंधितांना न्यायालयाने तपास अधिकारी बोलावतील, त्यावेळी तपासास हजर राहणे आणि पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करण्याचा अटीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.





