कोल्हापूरातही ‘ऑपरेशन टायगर’ राबवणार? ‘हा’ माजी आमदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

Shiv Sena Operation Tiger | विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश करण्यासाठी राजकीय नेत्यांची एकप्रकारे चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) ‘ऑपरेश टायगर’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता शिंदे गटाकडून कोल्हापूरतही ‘ऑपरेश टायगर’ राबवले जाण्याची शक्यता आहे. हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मिणचेकर 27 फेब्रुवारीला शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या फूट पडल्यानंतरही मिणचेकर उद्धव ठाकरेंसोबत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते.
सध्या कोल्हापूरात शिंदे गटाकडून सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून कोल्हापूरमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील’, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत असल्याने पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.





