M. A. Baby : केरळचे माजी मंत्री एम.ए.बेबी यांची माकपच्या सरचिटणीसपदी निवड

मदुराई : केरळचे माजी मंत्री एम.ए.बेबी यांची रविवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. केरळ आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. अशात माकप या डाव्या पक्षाची धुरा ७१ वर्षीय बेबी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्याचे राजकीय महत्व वाढले आहे.
सरचिटणीस हे माकपमधील सर्वोच्च पद आहे. ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे मागील वर्षी निधन झाल्याने ते पद रिक्त होते. तात्पुरती व्यवस्था म्हणून माकपने ज्येष्ठ नेते प्रकाश कारत यांना अंतरिम समन्वयक बनवले. अखेर नेतृत्वाचा विषय मार्गी लावत माकपच्या अधिवेशनात बेबी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते माकपच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या पॉलिट ब्युरोचे २०१२ यावर्षापासून सदस्य आहेत.
बेबी १९८६ ते १९९८ या कालावधीत राज्यसभा सदस्य होते. नंतर ते दोनवेळा आमदार बनले. त्यांनी २००६ ते २०११ या कालावधीत केरळच्या शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या केरळमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीची सत्ता आहे. मात्र, प्रभावक्षेत्र असणाऱ्या बंगालसह देशात इतरत्र माकप आणि इतर डाव्या पक्षांची राजकीय घसरण सुरू आहे. अशा आव्हानात्मक काळात बेबी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले आहे.


