भारताचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

David Johnson Commits Suicide: माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांनी आत्महत्या केली. चौथ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी जीवन संपवले. डेव्हिड जॉन्सन यांनी भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले होते. त्यांनी 1996 मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि त्याच वर्षी दुसरा कसोटी सामना खेळला. यानंतर त्यांना संधी मिळाली नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेले महान गोलंदाज अनिल कुंबळे यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून त्यांनी या माजी क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतासाठी दोन कसोटी सामने खेळण्याव्यतिरिक्त डेव्हिड जॉन्सन यांनी कर्नाटकसाठी दीर्घकाळ रणजी क्रिकेट खेळले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी गुरुवारी एका खाजगी अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ते डिप्रेशनचे बळी ठरले. जॉन्सन यांनी नैराश्यामुळे हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच कोठानूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह क्रिसेंट रुग्णालयात नेला.
Saddened to hear the passing of my cricketing colleague David Johnson. Heartfelt condolences to his family. Gone too soon “ Benny”!
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2024
डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर श्रद्धांजली संदेश टाकले जात आहेत. जॉन्सन यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी पोस्ट केली आहे. अनिल कुंबळे म्हणाले, “माझा क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. बेनी लवकर गेले!, त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना.”
Saddened by the passing away of David Johnson. May god give strength to his family and loved ones.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) June 20, 2024
माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने 52 वर्षीय डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनावर एक्स पोस्ट करताना लिहिले, “डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना शक्ती देवो.”
डेव्हिड जॉन्सन वेगवान गोलंदाजी करायचे, पण त्यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. ऑक्टोबर 1996 मध्ये, त्यांनी भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला आणि डिसेंबर 1996 मध्ये, त्यांनी टीम इंडियासाठी दुसरा कसोटी सामना खेळला, जो त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यांनी कर्नाटकसाठी 39 प्रथम श्रेणी सामने आणि 33 लिस्ट ए सामने खेळले. 1992 मध्ये त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2002 पर्यंत ते सक्रिय राहिले. फिटनेस आणि फॉर्ममुळे त्यांना फार काळ भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. दोन कसोटी सामन्यांत त्यांना केवळ 3 विकेट घेता आल्या होत्या.





