पुणे | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} : माजी गृहमंत्री आणि राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. गृहमंत्री असताना त्यांनी भाजप नेते व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जळगावचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त (एसीपींवर) प्रवीण मुंडे यांच्यावर दबाव आणला असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या तपासातून पुढे आले आहे. याबाबतचा अहवाल सीबीआयने येथील मोक्का न्यायालयात विशेष न्यायाधीश (मोक्का) पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सादर केलाआहे.
जळगावमधील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी महाजन आणि इतरांनी धमकी देत अपहरण केले आणि खंडणी उकळल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाजन, रामेश्वर नाईक, नीलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर मोक्कानुसार कारवार्इ करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात चौकशी सुरू केली होती.
नक्की काय आहे या प्रकरणात
संस्थेचा ताबा गिरीश महाजनांना हवा आहे. त्यासाठी ते एक कोटी रुपये द्यायला तयार आहेत. मात्र, ॲड. पाटील यांनी नकार दिल्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा गुन्हा जळगावमध्ये दाखल झाला.
त्यानंतर हे प्रकरण कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. याच प्रकरणात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे १२५ तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले होते. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे वर्ग झाले होते.





