इंग्लंडचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू पार्क्स कालवश

लंडन – इंग्लंड क्रिकेट संघाचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू माजी यष्टीरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते, तसेच इंग्लंडच्या हयात असलेले सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू होते. येथील रुग्णालयात पार्क्स यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याच्या घरात पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पार्क्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यष्टीमागे एक हजारपेक्षा जास्त बळी मिळवले आहेत. पार्क्स यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. 1959-60 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्यांनी इंग्लंडकडून शतकी खेळी केली होती.
पार्क्स यांनी 1954 ते 1968 या कालावधी दरम्यान 46 कसोटी सामने खेळले होते. त्यानंतरची आणखी वर्षे त्यांनी काउंटी क्रिकेट खेळले. क्रिकटमधून निवृत्त झाल्यानंतर पार्क्स यांनी ब्रुअर व्हिटब्रेडसाठी आणि ससेक्स क्रिकेट क्लबचे व्यवस्थापक म्हणून काम केले. पार्क्स यांचा मुलगा बॉबी हादेखील क्रिकेटपटू आहे.





