दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदियांच्या कोठडीत आणखी वाढ

नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या उत्पादनशुल्क धोरणात घोटाळा केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या कोठडीत सीबीआय कोर्टाने आणखी दोन दिवस वाढ केली आहे. विशेष न्यायाधिश एम. के. नागपाल यांनी सिसोदिया यांना सोमवार कोर्टापुढे हजर करण्याचा आदेश दिला आहे.
सिसोदिया यांच्या तीन दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आले त्यावेळी सीबीआयने त्यांच्या आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने त्यांना दोन दिवसांचीच कोठडी मंजुर केली. यावेळी सिसोदिया यांच्या वकिलाने असा दावा केला की सीबीआयचा तपास अपुर्ण राहिला आहे म्हणून आरोपीची कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात काहीच अर्थ नाही आणि तपास अपुर्ण आहे हा जादा कोठडी मागण्याचे कारण असू शकत नाही असे ते म्हणाले.
सिसोदिया हे तपास कामात सहकार्य करीत नाहीत या कारणासाठीही सीबीआयला त्यांची कोठडी वाढवता येणार नाही. कोठडीतील तपासादरम्यान सिसोदिया यांना तेचतेच प्रश्न वारंवार विचारले जाऊ नये असेही कोर्टाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितले.




