महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने साथ सोडली

मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक आणि माजी नगरसेवक राजुल पटेल उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी 5.30 वाजता ठाण्यात त्या पक्षप्रवेश करतील अशीही माहिती समोर येत आहे.
राजुल पटेल कोण आहेत?
राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून यावेळी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांच्याऐवजी हारून खान यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. राजुल पटेल ह्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या, त्याशिवाय त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
वर्सोवा शिवसेनेचा बालेकिल्ला –
वर्सोवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात राजूल पटेल यांचे राजकीय वजन आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकांच्या तोंडावरच ठाकरेंना दे धक्का –
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक राजकीय धक्के बसत आहेत. त्यामध्ये, काही दिवसांपूर्वीच सावंतवाडी येथील तालुका प्रमुखाने ठाकरेंची साथ सोडली असून माजी आमदार राजन साळवी हेही ठाकरेंच साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जालना व संभाजीनगर जिल्ह्यातही ठाकरेंना धक्का देत काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना मोठे आव्हान असणार आहे.





