मुंबई – मुंबईतील एक माजी नगरसेवक कमलेश राय यांनी बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे 35 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच आरोपीने संबंधित कंत्राटादारकडून 8 लाख रुपयांची लाच देखील स्वीकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी, आरोपीला न्यायालयात हजर केले असता 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी माजी नगरसेवक कमलेश राय याला 5 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले होते. मात्र, अटक झाल्यानंतर कमलेश राय यांची तब्येत बिघडल्यामुळे महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर आज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी कमलेश रायला अंधेरी न्यायालयात हजर केले. आरोपी राय याच्याकडून 8 लाख रुपये रिकव्हर करण्यासाठी अंधेरी न्यायालयाकडे पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.