हिमाचलमध्ये काँग्रेसच्या माजी आमदारावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

बिलासपूर – हिमाचलच्या बिलासपूरमध्ये होळीच्या दिवशी काॅंग्रेसचे माजी आमदार बंबर ठाकूर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 12 राऊंड गोळीबार केला. गोळीबारात बंबर ठाकूर यांना एक गोळी लागली तर पीएसओला तीन गोळ्या लागल्या. माजी आमदाराला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. चंद्रा सेक्टरमध्ये बंबर ठाकूर दुपारी त्यांच्या समर्थकांसह होळी खेळत असताना गोळीबाराची घटना घडली. बंबर ठाकूर यांना आयजीएमसी शिमला आणि पीएसओ यांना बिलासपूर एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माजी आमदार बंबर ठाकूर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. सात महिन्यांपूर्वीही बंबर ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल करून हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ल्यासाठी 4 आरोपी आले होते. पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.





