पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य काळाच्या पडद्याआड; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Budhadev Bhattacharya| पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. अखेर आज सकाळी 8.20 वाजता त्यांनी कोलकातामधील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
बुद्धदेव भट्टाचार्य हे दीर्घकाळापासून सीओपीडी आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. भट्टाचार्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते. त्यांनी 2015 मध्ये सीपीआय(एम) च्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीचा राजीनामा दिला. तर 2018 मध्ये त्यांनी राज्य सचिवालयाचे सदस्यत्व सोडले होते.
बुद्धदेव भट्टाचार्य कोण होते?
बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू आरोग्याच्या कारणास्तव 2000 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्या. त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.
ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. त्यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनशी जोडले गेले. त्यांना सीपीआयच्या युवा शाखेचं राज्य सचिव बनवण्यात आलं, जी नंतर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले याशिवाय पश्चिम बंगालमध्ये आयटी क्षेत्राशी निगडित मोठी गुंतवणूक आणण्यात त्यांना यश आले.
हेही वाचा:
नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; संजय राऊतांवरील ‘ते’ विधान भोवणार





