ब्रह्मोसचा माजी अभियंता निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा; ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप

Brahmos engineer nishant agarwal – ब्रह्मोस एरोस्पेसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला नागपूर न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अग्रवाल याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ला दिल्याबद्दल निशांत अग्रवालला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.
निशांत अग्रवाल ब्रह्मोस एरोस्पेसमध्ये वरिष्ठ यंत्रणा अभियंता होता आणि क्षेपणास्त्र प्रकल्पांमध्ये काम करत होता. ISI ला प्रकल्पांची गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपावरून अग्रवालला 2018 मध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ATS आणि मिलिटरी इंटेलिजन्सने नागपूरजवळ अटक केली होती.
ब्रह्मोस एरोस्पेस हा DRDO आणि रशियाच्या मिलिटरी इंडस्ट्रियल कन्सोर्टियम (NPO Mashinostroyenia) चा संयुक्त उपक्रम आहे, जो भारतात सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करतो. ही सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे जमीन, हवा, समुद्र आणि अगदी पाण्याखालून डागता येतात.
2018 मध्ये अग्रवालला अटक करण्यात आली तेव्हा या बातमीने खळबळ माजवली, कारण ब्रह्मोस एरोस्पेसशी संबंधित हे पहिले हेरगिरी प्रकरण होते. अग्रवाल हे नेहा शर्मा आणि पूजा रंजन या दोन फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचा आरोप तेव्हा झाला होता. इस्लामाबादमधून चालवली जाणारी ही खाती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था चालवतात असे मानले जाते.
निशांत अग्रवाल हा अतिशय हुशार अभियंता होता. त्याला डीआरडीओच्या यंग सायंटिस्ट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. तो एनआयटी कुरुक्षेत्रचा माजी विद्यार्थी आहे. आरोपपत्रानुसार त्याच्या लॅपटॉपमधून अत्यंत गोपनीय फाइल्स सापडल्या आहेत. याशिवाय एक सॉफ्टवेअरही सापडले, ज्याद्वारे लॅपटॉपमध्ये असलेली संवेदनशील तांत्रिक माहिती परदेशात आणि समाजकंटकांना पाठवली जात होती.





