भाजपला मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई – यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रस भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी आज गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून देशमुख यांनी सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. देशमुख यांचा शिवसेना प्रवेश शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड आणि भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. देशमुख यांची यवतमाळ,दिग्रस, आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी सहकाऱ्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/ejZdgqP4kh
— Shivsena Communication (@ShivsenaComms) October 20, 2022
संजय देशमुख यांच्या प्रक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मागील काही दिवसांत अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकारणामध्ये संबंध नाही असे लोक, तसंच वेगवेगळ्या धर्माचे लोक आमच्यासोबत येत आहेत. तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहे असे सगळ्यांचं म्हणणं आहे. ठाण्यात जाहीर सभा घ्यायची आहे. पोहरदेवीच्या दर्शनाला यायचे आहे, तारीख तुम्ही ठरवा, मी येईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. घाईघाईने निवडणूक आयोगाकडे जाऊन आमचे नाव आणि चिन्ह गोठवले. ठीक आहे पण मी माझं नाव आणि चिन्ह घेऊन पुढे जात आहे. जे गेलेत ते स्वतः लढले नाहीत, भाजपला पुढे केले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय देशमुख यांनी 1998 मध्ये शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात केली होती. संजय राठोड यांच्यासोबत ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत. 1999च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली होती. यावेळी ते विजयी देखील झाले होते. त्यानंतर 2004 मध्येही ते अपक्ष म्हणून विजयी झाले होते. 2009 मध्ये मात्र तत्कालिन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी संजय देशमुखांचा पराभव केला होता. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढले होते. दरम्यान, यवतमाळ मध्ये उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांच्या विरुद्ध पर्याय मिळाला आहे.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्र्यांनी केलं स्पष्ट https://t.co/DTBVjkfnlf
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 20, 2022





