नाशिकमधील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी

नाशिक : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी त्यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. विजय गायकवाड या नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली. या प्रकरणी संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश शहाणेंचा सुधाकर बडगुजरांवर आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वातावरण तापले आहे. यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या धमकी प्रकरणाबाबत सुधाकर बडगुजर यांना विचारले असता ते म्हणाले की, मुकेश शहाणेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. महिला आघाडीने काल आंदोलन केलं होतं. मुकेश शहाणे यांना अटक करा, असे त्यात म्हटले होते. काल आंदोलन केले त्याची ही प्रतिक्रिया आहे.
आंदोलनामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आज काहीतरी करायचे म्हणून आरोप केले आहेत. धमकी देणारा तो व्यक्तीच सांगेल की कोणी सांगितले. कोणी धमकी द्यायला सांगितले, याचा पोलीस तपास करतील. पोलिसांवर कालच्या मोर्च्याचे दडपण म्हणून हे सगळं सुरू आहे, असे सुधाकर बडगुजर म्हणाले.





