Paris Olympics 2024 : बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर प्रकाश पदुकोण संतापले, म्हणाले “सरकारने काम केले, आता खेळाडूंनी…”

Paris Olympics 2024 :- यंदा सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), टॉप्स (लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजना) या सर्वांनी त्यांचे काम चोख पार पाडले आहे. सरकार, क्रीडा मंत्रालय, साई, टॉप्स किंवा अन्य कोणीही, यापेक्षा अधिक काही करु शकते, असे मला वाटत नाही. त्यामुळे, मला वाटते, आता वेळ आली आहे की, खेळाडूंनीही स्वतः काही जबाबदारी घेतली पाहिजे, असे म्हणत माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे.
लक्ष्य सेनच्या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘तो (लक्ष्य) चांगला खेळला. तो स्पर्धा पूर्ण करू शकला नाही म्हणून मी थोडा निराश आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामन्याच्या पहिल्या गेममध्येही तो विजयी स्थितीत होता, परंतू नंतर तो मागे पडला, असेही ते म्हणाले.
प्रकाश पदुकोण पुढे म्हणाले, कांस्यपदकाच्या सामन्यातही, पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्याने 8-3 अशी आघाडी घेतली होती. मात्र, वेगवान खेळणाऱ्या खेळाडूसमोर तो नेहमी थोडा अस्वस्थ होतो. त्याने या गोष्टीवर थोडे अधिक काम करणे आवश्यक आहे. दोन्ही सामन्यांमध्ये त्याचा आत्मविश्वास कमी होता. आम्ही बॅडमिंटनमध्ये यंदा एकही पदक जिंकू शकलो नाही, याबद्दल मी निराश आहे, असेही पद्दकोण पुढे म्हणाले. पदुकोण 15 सदस्यीय भारतीय बॅडमिंटन संघासोबत मार्गदर्शक म्हणून पॅरिसला गेले आहेत.
“जर एखादा खेळाडू जिंकला तर सर्वजण श्रेय घेण्यासाठी पुढे येतात आणि जर ते हरले तर त्यात फक्त खेळाडूचा दोष? तयारीचा अभाव आणि खेळाडूंची योग्य तयारी न करून घेण्यासाठी प्रशिक्षकांना जबाबदार का धरले जात नाही? विजयाचे श्रेय घेणारा पहिला माणूस आपल्या खेळाडूंच्या पराभवाची जबाबदारी का घेत नाही?”
-अश्विनी पोनप्पा, भारतीय बॅडमिंटनपटू
व्हिक्टर, झियाकडून पराभूत
4 ऑगस्ट रोजी बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा डेन्मार्कच्या एक्सेलसेन व्हिक्टरने सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना 54 मिनिटे चालला. 22 वर्षीय लक्ष्यने पहिल्या गेममध्ये एका वेळी 18-13 अशी आघाडी घेतली होती. मात्र, अनुभवी व्हिक्टरने पिछाडीवर पडूनही आपला वेग पुन्हा मिळवला.
त्यानंतर लक्ष्यला कांस्यपदकाच्या लढतीतही पहिला गेम जिंकूनही 1-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. मलेशियाची जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकाची खेळाडू ली जी जियाने लक्ष्यचा 13-21, 21-16 आणि 21-11 असा पराभव केला. यासह बॅडमिंटनमधील भारताची शेवटची आशाही संपुष्टात आली.





