मायबोली मराठीचा विसर ! पिंपरी चिंचवड महापालिका उदासीन.. मराठी भाषा संवर्धन सप्ताह कोरडाच

पिंपरी – राज्य सरकार आणि प्रशासनाचा कारभार मराठी भाषेतूनच चालतो. गाव, खेडी, वाड्या-वस्त्यांपासून ते मोठ-मोठ्या महानगरांमध्ये मराठी बोली भाषेला प्राधान्य दिले जाते. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्यभरात लढा सुरु आहे. परंतु, मराठी भाषा संवर्धन सप्ताहाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला विसर पडला आहे. अनावश्यक कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणा-या प्रशासनाला मराठी भाषा संवर्धनासाठी एक कार्यक्रम घ्यावा, असे वाटले नाही. आयुक्त शेखर सिंह यांचे लक्ष नसल्यामुळे खालच्या फळीतील अधिका-यांमध्ये उदासीनता निर्माण झाल्यानेच मराठीचा तिरस्कार केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
परंपरेने शहराला लाभलेला मराठी भाषेचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वतंत्र क्रीडा, कला, सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत शहरातील नाट्यगृहे, रंगमंदिरे, सभागृहे चालवली जातात. त्याठिकाणी मराठी भाषेतील नाट्य महोत्सव, काव्य महोत्सव भरवले जातात. शहरात ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आहे. माजी नगरसेवक भाऊसाहेब बोईर यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवडमध्ये १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा सोहळा नुकताच पार पडला आहे. तरी, महापालिका प्रशासनाला मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करावा असे वाटले नाही. राज्य शासनाकडून १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड महापालिकेलाही यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देश आलेले आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाने मराठी भाषा संवर्धन सप्ताहात एकही कार्यक्रम आयोजित केला नाही, ही शोकांतिका आहे. महापालिकेलाच मराठी भाषेचा तिरस्कार निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शहरात महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक मराठी शाळा कार्यरत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकच्या जवळपास ४५ हजार विद्यार्थ्यांना दररोज मराठी भाषा अभ्यासक्रमात शिकविली जाते. मराठी भाषेचा पाया भक्कम करणारे आचार्य अत्रे, ग. दि. माडगुळकर, प्रा. रामकृष्ण मोरे, नटसम्राट निळू फुले अशा दिग्गज व्यक्तिमत्वाची नावे महापालिकेने मराठीचे संवर्धन करण्यासाठी सुरु केलेल्या सभागृहाला दिली आहेत. एवढेच काय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला मराठीचे वावडे असावे, यापेक्षा दुर्भाग्याची बाब दुसरी नसावी. दोन्ही संतांचे अलौकीक पालखी सोहळे शहरातूनच पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. याचे नियोजन देखील महापालिका प्रशासन चोखपणे करते. परंतु, याच महापालिकेला मराठीचा विसर पडल्याची विदारक वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. महापालिकेकडून विविध उपक्रम, कार्यक्रम, सोहळे घेऊन त्यावर कोट्यवधी रुपये अनावश्यकपणे खर्च केले जातात. मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्यासाठी महापालिकेला आर्थिक चणचण भासत आहे का ? असा प्रश्न मराठी भाषकांनी उपस्थित केला आहे.
मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करणेबाबत वरिष्ठांचे तसे आदेश आलेले नाहीत. याठिकाणी असा उपक्रम घेतला जातो की नाही, हे पहावे लागेल. वरिष्ठांकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणे उचित ठरेल का ? ते पाहिले जाईल.
– मिनीनाथ दंडवते, उपायुक्त – क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभाग
प्राथमिक आणि माध्यमिक विभागाकडून शालेय स्तरावर मराठी भाषा संवर्धन सप्ताहनिमित्त कार्यक्रम घेतलेला नाही. याबाबत वरिष्ठांना विचारुन पुढील कार्यवाही हाती घ्यावी लागेल.
– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त – शिक्षण विभाग





