विसरा दुष्काळ अन्‌ महापूरही विसरून जा!

वेदना विरल्या; आता फक्त चौकशी, राजकारण, पक्षांतर आणि श्रेयवादाचेच तुणतुणे

– श्रीकांत कात्रे

सातारा – महापूर ओसरला. अनेक प्रश्‍न पुढे ठेवून गेला. अनेकांचे आयुष्य उद्‌वस्त झाले. संसार पाण्यात वाहून गेले. घरांचे, शेतीचे नुकसान झाले. रस्ते, पूल, आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या, शाळांच्या इमारती अशा सार्वजिनक सोयीसुविधा पुरामुळे अडचणीत आल्या. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्‍न आज आपल्यासमोर आहे. समाजातील संवेदनशील संस्था, व्यक्तींकडून पुरगरस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. या प्रश्‍नांची भीषणता लक्षात घेऊन उपाययोजनांना गती दिली पाहिजे. आस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकट अधिक गहिरे असते. यावेळी तरी तसे व्हायला नको, असे वाटत राहते.

एकीकडे पुरस्थितीमुळे निर्माण झालेले गांभीर्य असताना दुसरीकडे काही भागात दुष्काळाची तीव्रता आणखी कठीण प्रसंग निर्माण करीत चाललेली आहे. परंतु, या साऱ्या प्रश्‍नांचा निचरा कसा होणार, असा प्रश्‍न पडावा, असेच वातावरण आता जाणवू लागले आहे. विधानसभा निवडणुकीचे रंग त्यात मिसळू लागले आहेत. काही नेत्यांच्या चौकशीचे प्रकरण, प्रमुख नेत्यांचे पक्षांतर, विकास कामांसाठी श्रेयवाद अशा स्वरूपाचे विषय पुढे येत राहिले आहेत. आगामी काही महिने हीच स्थिती असण्याची भीती आहे. पुरग्रस्तांच्या वेदनांना जाणून घेऊन त्यांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्‍यातील अनेक गावांना या महापुराचा फटका बसला. आभाळातून कोसळणारा पाऊस आणि धरणातून नदीपात्रात येणारे पाणी यामुळे यापूर्वी कधीही नव्हती अशी स्थिती अनुभवली. या दोन तालुक्‍यांखेरीज वाई, महाबळेश्‍वर, जावळी, सातारा या तालुक्‍यातही अतिवृष्टी किंवा पुराचा फटका बसला. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात तर महापुराने अनेकांचे जगणे नेस्तनाबूत केले. काही दिवस आपले घर सोडून इतरत्र राहवे लागले. अनेकांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली घर, शेतीबाबत केलेल्या गुंतवणुकीची पुंजी नष्ट झाली. जीवितहानीसह माणसांचे मोठे नकसान झाले. मुक्‍या जनावरांचे बोल अबोल झाले. आता सारे नव्याने उभे करायचे अशी वेळ सर्वांवर आली. शासकीय पातळीवर पंचनाम्यांचे काम सुरू आहे. त्यातून नुकसानीचे नेमके स्वरूप समोर येणार असल्यामुळे ते व्यवस्थित होण्याची अपेक्षा आहे. शासनाच्या या कामाकडे राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील जाणकारांनी लक्ष देण्याचीही गरज आहे. परंतु महापूर ओसरला. काही दिवस सर्वांनीच भान राखले.

सुरवातीच्या काळात मदतीचा ओघ प्रचंड प्रमाणात राहिला. पुरस्थितीचा हळूहळू विसर पडत चालल्यासारखे वातावरण तयार होऊ लागले आहे. महापुराचे परिणाम तात्पुरते नाहीत. त्यावर दीर्घकाळ काम करण्याची गरज आहे. उध्वस्त जीवन पुन्हा उभे करणे ही गोष्ट सहज जाताजाता करण्यासारखी नाही. त्याकडे विशेष लक्ष देऊन प्राधान्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांनी समन्वयाने राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून हे काम करायला हवे. विधानसभेची रणुमाळी सुरू होण्यापूर्वी पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासह सर्व प्रश्‍न सोडविण्याचे नियोजन झाले पाहिजे. ही सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे.

पण सर्वसामान्यांच्या अपेक्षा लक्षात घेतो कोण, अशी या लोकशाही राज्याची अवस्था झाली आहे. अशा गंभीर प्रश्‍नांऐवजी कमी महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधून घेण्याचे तंत्र अवलंबिले जाते. त्यामुळेच आता महापूर विसरा आणि दुष्काळही. आता लक्ष द्या “इडी’च्या कचाट्यात कोण सापडते याकडे. शिवसेना किंवा भाजपच्या गळाला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून कोणते नेते लागताहेत,याकडे लक्ष द्या. पक्षीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, नेत्यां- नेत्यांमधील कलगीतुरे ऐका. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रंगलेली श्रेयवादाची लढाई पाहा. माणसे त्यात गुंतून जातात, असेच राजकीय आणि प्रशासकीय कारभाऱ्यांना वाटत असते. पण वस्तुस्थिती वेगळी आहे.

जनता शहाणी असते, हे लक्षात ठेवण्याची वेळ आहे. त्यामुळेच प्रामुख्यांने राजकारणातील धुरंधरांनी आणि प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपली मने जागी ठेवली पाहिजेत. पुरग्रस्तांच्या वेदना मनात ठेवून वाटचाल झाली तरच अजूनही माणुसकी कुठेतरी अस्तित्वात आहे, हे सिद्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)