‘खोक्या’च्या घरी वन अधिकाऱ्यांची धाड, प्राण्याचे मांस, गांजासह सापडलं मोठं घबाड

बीड : शिरूर तालुक्यातील भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. अशातच शिरुर कासार येथे एका व्यक्तीस बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भाईने हरणांची शिकार करुन त्यांचे मास खाल्ल्याचे समोर आले होते.
याच पार्शवभूमीवर वन विभागाच्या वतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत वन अधिकाऱ्यांनी आज खोक्या भाईच्या घरी धाड टाकून झाडाझडती घेतली आहे. यावेळी भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस आढळून आले. त्याशिवाय जाळ्या अन् गांजाही आढळला आहे. हरीण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वन विभागाला मिळाल्या आहेत.
वन विभागाने घेतलेल्या झडतीमध्ये सतीश भोसले याच्या घरी वन्य प्राणी पकडण्यासाठी वाघूर, चित्र पकडण्याचे जाळे, एक सतुर, एक सुरी, एक जर्मनचा डब्बा या डब्यामध्ये चरबी आढळून आली आहे. तसेच गांजा देखील आढळून आला आहे. 400 ते 500 ग्राम गांजा असलेल्या दोन पुड्या आढळून आल्या. तसेच घरात वाळलेले मांस आढळून आले आहे.
ही कार्यवाही विभागीय व अधिकारी अमोल गरकळ, वन परिक्षेत्राधिकारी श्रीकांत काळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रड, आष्टी वनपरिक्षेत्र विभागाचा संपूर्ण कर्मचाऱ्यांचा स्टाफ ते पथक सर्व स्टाफ त्यासोबत वन्य प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होते. भोसले याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.





