प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने मागील वीस दिवसांत तब्बल नऊ बिबट्यांना जेरबंद केले असले तरी, अजूनही शेकडो बिबटे फिरत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.गावकुसात, शिवारात, ओसाड जागांवर आणि विशेषतः उसाच्या फडात बिबट्यांच्या पावलांचे ठसे आणि हालचाली आढळत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. याच काळात गुरे-ढोरांवरही दररोज हल्ल्याच्या घटना घडत आहेत.या पार्श्वभूमीवर वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवली असून, वनरक्षकांचे पथक रात्रपाळ्यांमध्ये सक्रिय आहे. थर्मल कॅमेरे, पगमार्क सर्व्हे आणि ड्रोनच्या मदतीने परिसरावर लक्ष ठेवले जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, परिसरात घनदाट उसाचे पीक आणि पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने बिबट्यांना येथे आश्रय मिळतो. मात्र, स्थानिक ग्रामस्थांचा प्रश्न आहे की, “बिबटे पकडले हे ठीक आहे, पण अजून किती आहेत हे कळत नाही. सुरक्षितता कधी मिळणार? हेच समजत नाही.” जंगल क्षेत्रातील अतिक्रमण, नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास आणि अन्नसाखळीतील बदल यामुळे बिबट्यांचे गावांमध्ये आगमन वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ बिबटे पकडण्याने ही समस्या सुटणार नसून, दीर्घकालीन उपाय म्हणजे अधिवास संवर्धन आणि जनजागृती आवश्यक आहे. वनविभागाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाल दिसताच त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.