परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली ब्लिंकेन यांच्याशी चर्चा

वॉशिंग्टन : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबरोबरच पश्चिम आशियात वेगाने घडत असलेल्या घडामोडींबाबत देखील दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली.
मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर जयशंकर पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. डेलावेअर येथे पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ज्या बायडेन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठका आणि क्वॉड परिषदेतल्या चर्चेचा पाठपुरावा यावेळी घेण्यात आला, असे जयशंकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बायडेन यांचे मूळ गाव असलेल्या डेलावेअर येथील निवास्थानी बायडेन यांनी मोदी यांना आमंत्रित केले होते. तेथेच दोन्ही नेत्यांमध्ये २१ सप्टंबर रोजी द्विपक्षीय बैठक देखील झाली होती.
या नियोजनाबद्दल जयशंकर यांनी बायडेन प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील विविध घडामोडींबाबत भारत आणि अमेरिका सहयोगाने काम करत आहे. वातावरण बदल, प्रादेशिक सुरक्षा वाढवणे आणि समृद्धी कायम टिकवण्याच्या मुद्यांवर दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत असल्याचेही जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनला दिलेल्या बेटीचा ब्लिंकेन यांनी विशेष उल्लेख केला. युक्रेनमधील स्थायी आणि चिरकालिन शांततेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.





