परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मालदिव, श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना, ‘हे’ महत्वाचे करार होणार

नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे आजपासून श्रीलंका आणि मालदिवच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. आपल्या या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ते मालदिवला जाणार आहेत. तेथे मालदिवलचे अध्यक्ष इब्राहिम मोहंम्मद सोलिह यांची भेट घेणार आहेत. मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याबरोबर जयशंकर यांची चर्चा होणार आहे.
या भेटीदरम्यान द्विपक्षीय विकास आणि भागीदारीच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत, मालदिवमध्ये भारताच्या पुढाकाराने काही विकास कामे सुरू करण्यात येणार आहेत. या प्रकर्वांच्या माध्यमातून भारत आणि मालदिवदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधामध्ये सकारात्मक वाढ होणार आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दिनांक 28 मार्चपासून जयशंकर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून तेथेही द्विपक्षीय संबंधांबाबत वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांची चर्चा होणार आहे. दिनांक 29 मार्च रोजी श्रीलंकेत होणाऱ्या बिम्सटेक परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत देखील जयशंकर सहभागी होणार आहेत.





