Foreign exchange: परकीय चलन साठ्यात घसरण चालूच

मुंबई – शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूक परत जात आहे. जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे निर्यात फारशी वाढत नाह. परकीय गुंतवणुकीचे प्रकल्प मंदावले आहेत. अशा परिस्थितीत भारताकडील परकीय चलन साठ्यात होत असलेली घट कायम आहे.
रिझर्व बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 22 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 1.313 अब्ज डॉलरने कमी होऊन 656.582 अब्ज डॉलर या पातळीपर्यंत खाली आला आहे. या अगोदरच्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलन साठा तब्बल 17.761 अब्ज डॉलरने कमी झाला होता. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि रिझर्व बँक भारताकडील परकीय चलन साठ्याचे संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत.
मात्र जागतिक परिस्थिती इतकी खराब आहे की, या प्रयत्नांना पुरसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरच्या सुमारास अमेरिकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केल्यानंतर बरीच परकीय गुंतवणूक भारतात येऊन, त्यावेळी भारताकडील परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलरपर्यंत वाढला होता. मात्र त्यानंतर परकीय चलन साठ्यात एकतर्फी वेगाने घट होत आहे.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या मूल्यात 1.828 अब्ज डॉलरची वाढ होऊन भारताकडील सोन्याच्या साठ्याचे मूल्य 67.573 अब्ज डॉलरवर गेले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे ठेव 4.232 अब्ज डॉलरवर गेली आहे.
इतर सर्वच चलनाच्या तुलनेत डॉलर वधारत असल्यामुळे विविध देशाच्या परकीय चलन साठ्याच्या मूल्यावर त्याचा परिणाम झालेला आहे. सध्या सहा महत्त्वाच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 106 अंकाच्या जवळपास आहे. मात्र भारताकडे सध्या असलेला परकीय चलन साठा भारताला दीर्घ पल्ल्याच्या आयातीसाठी पुरेसा आहे असे समजले जाते.





