भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढली; अमेरिकेतून तीन पटीने वाढ!

नवी दिल्ली – जागतिक व्यापार आणि अर्थविषयक परिस्थिती खराब असली तरी परदेशी गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी आहेत. भारतातील वित्त आणि बँकिंग क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली.
सध्या जागतिक बाजारात खराब वातावरण आहे. शेअर बाजाराबरोबरच थेट परदेशी गुंतवणूक थांबलेली आहे. याला विकसित देशही अपवाद नाहीत. मात्र तरीही भारताबाबत जागतिक गुंतवणूकदार व कंपन्यांमध्ये कमालीचे आशावादी वातावरण असल्याचा दावा गोयल यांनी केला. करोनाच्या काळातही जागतिक वातावरण खराब असताना भारतामध्ये गुंतवणूक वाढली होती. सध्या जागतिक वातावरण खराब होत असूनही भारतातील गुंतवणुकीवर कसलाही परिणाम झालेला नाही.
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर रुपयाच्या अवमूल्यनामुळे परिणाम झाला असला तरी थेट परकीय गुंतवणुकीच्या प्रकल्पावर मात्र परिणाम झालेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणूक बर्याच प्रमाणात आली आहे, असा दावा गोयल यांनी यांनी केला.
गोयल यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात झालेली थेट परकीय गुंतवणूक 15 टक्क्यांनी वाढून 18.62 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीमध्ये अमेरिकेतून भारतात झालेली थेट परकीय गुंतवणूक तीन पटीने वाढून 5.61अब्ज डॉलर झाली आहे.
याच काळात अमेरिकन सरकारने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेदरम्यानचे व्यापारी संबंध खराब झाले आहेत, असे समजले जाते. मात्र प्रत्यक्षात अमेरिकेतील उद्योग आणि गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात या दोन देशांदरम्यानचे संबंध बळकट होणार असल्याचे यातून स्पष्ट होते.





