“फोर्ड” कंपनी भारतातील दोन्ही प्रकल्प बंद करणार

नवी दिल्ली – अमेरीकेतील फोर्ड कंपनीने भारतातील कामकाजाची पुनर्रचना करण्याचे ठरविले असून या अंतर्गत कंपनीच्या दोन्ही प्रकल्पातील उत्पादन बंद करण्यात येणार आहे. या कंपनीने चेन्नई आणि सानंद येथे 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून प्रकल्प उभारले होते.
आता या प्रकल्पातील उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात येणार असून भारतामध्ये फक्त आयात केलेल्या कार विकल्या जाणार असल्याचे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
फोर्ड कंपनीची भारतातील उत्पादन क्षमता 6 लाख इंजीन व 4 लाख 40हजार वाहन निर्मितीची होती. अगोदर फोर्ड मोटार कंपनीने आक्टोबर 2019 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीबरोबर सहकार्याचा करार केला होता. मात्र यावर्षी जानेवारीमध्ये हा करार संपुष्टात आल्याचे दोन्ही कंपन्यांनी सांगितले होते.
या अगोदर 2017 मध्ये जनरल मोटार या अमेरिकन वाहन उत्पादन कंपनीने भारतातील उत्पादन थांबविले होते. जनरल मोटर्स भारतामध्ये वीस वर्षापासून कार्यरत होती. मात्र कंपनीला फारसा नफा होत नव्हता. त्यानंतर कंपनीने गुजरातमधील प्रकल्प एमजी मोटर्स या कंपनीला विकला. निर्यातीसाठी तळेगाव येथील कारखान्यातून उत्पादन सुरू होते. मात्र या कारखान्यातील उत्पादन डिसेंबर महिन्यापासून बंद झाले आहे.





