“फोर्ड’ने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प गुंडाळला

नवी दिल्ली- अमेरिकेतील फोर्ड कंपनीला भारतामध्ये निर्यात करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची परवानगी भारत सरकारने दिली होती. त्यासाठी उत्पादन आधारित अनुदान या कंपनीला दिले जाणार होते. मात्र तरीही या कंपनीने भारतातील हा प्रकल्प गुंडाळला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने भारतातील दोन प्रकल्पातील वाहन उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पर्यायी उत्पादने विकसित करण्याचे कंपनीने ठरविले होते. दरम्यानच्या काळात कंपनीने भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली होती. भारत सरकारने ही परवानगी देण्याबरोबरच अनुदान जाहीर केले होते. कंपनीच्या प्रवक्त्यायाने म्हटले की भारत सरकारने परवानगी दिल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. मात्र आम्ही सर्व परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन तयार करता येणार नाही असा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने 26 हजार कोटी रुपयांची उत्पादन आधारित अनुदान योजना वाहन निर्मात्या कंपन्यांसाठी जाहीर केली आहे. त्यासाठी भारतातील 20 कंपन्यांनी अर्ज केला होता. फोर्ड कंपनीने केलेला अर्ज मंजूर करण्यात आला होता. ज्या कंपन्यांना भारत सरकारने उत्पादन आधारित अनुदान जाहीर केले आहे, त्यामध्ये टाटा मोटर्स, सुझुकी, ह्युंदाई, किया, महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे.
फोर्ड कंपनीने म्हटले आहे की आमच्या जुन्या प्रकल्पातील कामगार संघटनांबरोबर आम्ही चर्चा करीत आहोत. आगामी काळामध्ये कोणत्या वाहनाचे उत्पादन केल्यास ते किफायतशीर ठरेल यासंदर्भात विचार करीत आहोत. तीन दशके काळात भारतामध्ये काम केल्यानंतर गेल्या वर्षी फोर्ड कंपनीने भारतातील उत्पादन थांबविले होते. भारतातील दोन पैकी एक प्रकल्प ही कंपनी टाटा समूहाला विकण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या कंपनीला अजून खरेदीदार मिळालेला नसल्याचे समजले जाते. आता फोर्ड कंपनी भारतामध्ये फक्त कारचे इंजिन तयार करीत आहे.





