Satara News : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह; सहा जणांवर गुन्हा दाखल

कराड : तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षे वयाच्या मुलीचा जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीनेच याबाबतची तक्रार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. विवाह न केल्यास ठार मारण्याची धमकी आई-वडिलांंनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार मुलीचे आई, वडील, पती, सासू, सासरे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते. तुला बघायला 12 जून रोजी पाहुणे येणार आहेत, असे तिला आई-वडिलांनी सांगितले. आपण आत्ता फक्त साखरपुडा करायचा आहे, अशी बतावणी त्यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील कोथळे येथील एक कुटुंब त्या मुलीचे स्थळ पाहायला आले. साखरपुडा करायचा म्हणून, थेट लग्नाची तयारी सुरू झाली.
मुलीच्या लक्षात आल्यावर, तिने माझे लग्नाचे वय नाही, असे म्हणत स्पष्ट नकार दिला. मात्र, तिच्या आई-वडिलांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या परवानगीशिवाय लग्न करून, तिला सासरी पाठवण्यात आले.
तिने सासरहून पळ काढून, कराड तालुका पोलीस ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरून आई, वडील, पती, सासू, सासरे, भटजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलीने केलेल्या विनंतीनुसार पोलिसांना तिला महिला वसतिगृहात ठेवले आहे.





