पुणे | ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता देखभालीसाठी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – युवा उद्योजक पुनीत बालन यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. इंद्राणी बालन फाउंडेशन आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्यात यासंबंधीचा करार नुकताच झाला.
पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्यावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी, वढू बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ, राजगुरुनगर मधील हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंचे जन्मस्थळ आणि तुळापूर येथील महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारकांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व ठिकाणी वर्षभर हजारो पर्यटक भेट देत असतात.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही संख्या अनेक पटीने वाढलेली असते. या ठिकाणांची देखभाल होणे आवश्यक असल्याने या स्मारकाची दैनंदिन स्वच्छता आणि देखभाल करण्याची तयारी बालन यांनी राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांच्याकडे पत्राद्वारे दर्शवली होती
पुरातत्व विभागाने त्यास तत्काळ परवानगी दिली. त्यानुसार या सर्व स्मारकांच्या ठिकाणी सामाजिक संस्था दायित्व योजनेअंतर्गत इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून सात सुरक्षा रक्षक कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.
सामाजिक संस्था दायित्व योजनेअंतर्गत चार संरक्षित स्मारकांचे देखभालीचे दायित्व इंद्राणी बालन फाउंडेशनने स्वीकारले आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेली राज्य संरक्षित स्मारकाच्या दैनंदिन देखभालीसाठी लोकसहभाग वाढत आहे,
ही खूप स्तुत्य बाब आहे. यामुळे स्मारकांची स्वच्छता राखणे आणि देखभाल करण्यास मदत होईल. आपला वारसा जपण्यासाठी इतरांनीही पुढाकार घ्यायला हवा. – विलास वाहणे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग
महाराष्ट्राला महापुरुषांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांची स्मारके ही नेहमीच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. पुणे शहर आणि परिसरात महापुरुषांची अनेक स्मारके आणि धार्मिक स्थळे आहेत. त्यांची व्यवस्थित देखभाल, स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
ही बाब लक्षात घेऊन आणि स्मारकांचे पावित्र्य जपले जावे या भावनेतून आणि सामाजिक दायित्व या जाणिवेतून त्यांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली आहे. – पुनीत बालन, युवा उद्योजक





