Footpath Encroachment : पुण्यात बिल्डरांची मनमानी! पदपथांवरच ठोकले जाहिरातींचे फलक; चालणे झाले अवघड…महापालिकेचे दुर्लक्ष
Footpath Encroachment : प्रभात आणि भांडारकर रस्ता परिसरातील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या जाहिराती थेट पदपथांवर; आधीच अरुंद असलेल्या गल्ल्यांमध्ये नागरिकांची कोंडी.

Footpath Encroachment – प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या जाहिराती बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृतपणे थेट पदपथांवर केल्याचे आढळते. विशेष म्हणजे, काही व्यावसायिकांनी चक्क रस्त्यावरच जाहिरातींचे लोखंडी सांगाडे उभारून त्यावर जवळपास दीड फूट बाहेर येतील, अशा पद्धतीने सजावटीचे दिवे लावले आहेत.
त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या गल्ल्यांमधून नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. सार्वजनिक जागेवर उभारलेल्या जाहिरातींमुळे पदचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. हे प्रकार राजरोसपणे सुरू असतानाही पालिकेचा बांधकाम, पथविभाग तसेच जाहिरातींवर कारवाईची जबाबदारी असलेला आकाशचिन्ह विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच, अनेक बांधकामांच्या ठिकाणी पालिकेच्या परवानगीची माहिती दर्शविणारे फलकही लावलेले नाहीत.
पदपथांवर जाहिरातींचे अतिक्रमण..
भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता परिसरातील अनेक गल्ल्यांमध्ये पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. या ठिकाणी संबंधित व्यावसायिकांनी त्यांच्या जागेभोवती पत्र्यांची संरक्षक भिंत उभारली आहे. नियमानुसार जाहिरात फलक हे स्वतःच्या जागेच्या आतील बाजूस लावणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी पत्र्यांच्या बाहेरील बाजूस, थेट पदपथावर लोखंडी सांगाडे उभारून त्यावर अँगलचे रॅक तयार करून जाहिराती लावल्या आहेत.
रस्त्यावर सजावटीचे दिवे
गल्ली क्र. ७ मध्ये सुरू असलेल्या एका पुनर्विकास प्रकल्पाच्या ठिकाणी थेट रस्त्यालगत जाहिरात फलक लावला आहे. गंभीर बाब म्हणजे या फलकावर हँगिंग लॅम्प बसविला असून ते रस्त्याच्या दिशेने फूटभर बाहेर आले आहेत. आधीच या गल्ल्या अरुंद असून परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे, अशा स्थितीत बाहेर आलेल्या दिव्यांमुळे वाहनचालक, नागरिकांना अपघाताच्या धोका संभवतो.
“बांधकाम व्यावसायिकांनी नियमानुसार त्यांच्या हद्दीत आणि ठरवून दिलेल्या आकारमानातच जाहिरात फलक लावणे अपेक्षित आहे, अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. जाहिरात फलक स्वतःच्या हद्दीतच लावणे बंधनकारक आहे.”
– संदीप कदम, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग





