Satara: ‘बालाजी’च्यावतीने गणेशोत्सव बंदोबस्तावरील पोलिसांना फूड पॅकेट
Satara गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये शहरातील विविध चौकात, विसर्जन मिरवणूक मार्गावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या शेकडो पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना ट्रस्टच्यावतीने गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दोन दिवस पौष्टिक फूड पॅकेटचे वाटप केले जाते. या फूड पॅकेटमध्ये 2 चपाती, भाजी, मसालेभात व शेंगदाणा चटणी यांचा समावेश असतो.

Satara: गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून गणेशभक्तांच्या सेवेत असलेल्या पोलीस जवानांच्या सेवेची जाणीव ठेवत येथील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बंदोबस्तावरील पोलीस जवानांना पौष्टिक अन्नाचे फूड पॅकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचे हे 28 वे वर्ष आहे.
गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये शहरातील विविध चौकात, विसर्जन मिरवणूक मार्गावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या शेकडो पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना ट्रस्टच्यावतीने गणेश विसर्जनाच्या शेवटच्या दोन दिवस पौष्टिक फूड पॅकेटचे वाटप केले जाते. या फूड पॅकेटमध्ये 2 चपाती, भाजी, मसालेभात व शेंगदाणा चटणी यांचा समावेश असतो.
याबाबत माहिती देताना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे म्हणाले, गणपती बाप्पाचे आगमन ते विसर्जनापर्यंत पोलीस जवान रात्रंदिवस उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कार्यरत असतात. सणाचा आनंद सर्वांना घेता यावा म्हणून ते स्वतःच्या सणाचा त्याग करतात. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस जवानांना ना वेळेवर अन्न मिळते, ना पाणी. त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न 1999 पासून सुरू केला आहे. यंदाचे हे 28 वे वर्ष आहे.
या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनानेही श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमा विषयी समाधान व्यक्त केले आहे. बंदोबस्ताच्या धावपळीत वेळेवर पोलीस जवानांना अन्न मिळणे ही मोठी मदत असते. ट्रस्टच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याची भावना पोलीस जवान व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केली.
यावेळी ट्रस्टचे सचिव संजय कदम, उदय गुजर, अंबाजी देसाई, जगदीश खंडेलवाल, दीपक मेथा, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, संजय निकम, राजेंद्र खंडेलवाल, नितीन माने, जगदीप शिंदे, विश्वनाथ फरांदे, श्रावण पाटील, तसेच ट्रस्टचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.





