Yogi Adityanath : दिल्लीतील घटनेनंतर योगी आदित्यनाथ अॅक्शन मोडमध्ये; घेतली ‘ही’ कडक भूमिका
दिल्लीतील घटनेनंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कडक भूमिका घेतली आहे. मालवीय नगरमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीची दखल घेत मुख्यमंत्री योगी यांनी कडक सूचना जारी केल्या आहेत.

Yogi Adityanath | Delhi : दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर, हौझ राणी येथील ‘फ्लोरीश स्टे बी अँड बी’ मध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील घटनेनंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कडक भूमिका घेतली आहे. मालवीय नगरमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीची दखल घेत मुख्यमंत्री योगी यांनी कडक सूचना जारी केल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व विकास प्राधिकरणे, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), अग्निशमन विभाग, तसेच इतर अनेक विभागांतील अधिकाऱ्यांना “सर्व उंच इमारती, कार्यालये, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करून अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे” निर्देश दिले आहेत. “सर्व हॉटेल्समध्ये विशेष सुरक्षा तपासणी करून त्याचा लेखापरीक्षण अहवाल सादर करावा.” असं सांगितलं आहे.
दिल्लीतील आगीच्या घटनेनंतर, अग्निशमन दलाचे कर्मचारी आज लखनौमधील विविध आस्थापनांमध्ये तपासणी करत आहेत. एफएसओच्या उपस्थितीत लखनौमधील जेमिनी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तपासणी करण्यात आली. सुरुवातीला पाणी उपसण्यात काही अडचणी आल्या, ज्या एका दिवसात दूर करण्याचे निर्देश मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी (CFO) दिले.
मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, लखनौमध्ये नऊ अग्निशमन केंद्रे आहेत. सर्व अग्निशमन केंद्रे आपापल्या भागातील सर्व आस्थापनांची प्रमाणित तपासणी करत आहेत आणि त्यांना कोणत्याही समस्या दूर करण्याचे निर्देश देत आहेत.
यापूर्वी, बुधवारी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल दुःख व्यक्त केले. एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री योगी म्हणाले, “दिल्लीतील भीषण आगीत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांप्रति आहेत. मी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतो की, दिवंगत आत्म्यांना शांती लाभो आणि जखमींना लवकरात लवकर बरे वाटो.”
दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात सकाळी सुमारे साडे आठ वाजता आग लागली आणि ती वेगाने संपूर्ण इमारतीत पसरली. अनेक स्थानिकांसह बचाव पथके, अरुंद पाच मजली इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून गेली, जिथे घटनेच्या वेळी अनेक लोक झोपले होते.





