Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे. संपूर्ण बारामती सुन्न झाली असून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. अनेक राजकीय मंडळींना अश्रु अनावर झाले आहेत. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, द्रौपदी मूर्मू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी : नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो. अजित पवार कष्टाळू व्यक्तिमत्व : नरेंद्र मोदी पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, अजित पवार जी हे जनतेचे नेते होते. त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.ओम शांती.दरम्यान अजित पवार यांच्या जाण्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाराष्ट्राने एक कष्टाळू नेता गमावला आहे. शिवाय बारामतीत देखील हळहळ व्यक्त होत आहे. द्रौपदी मूर्मू यांनी व्यक्त केलं दुःख अजित पवार यांच्या निधनानंतर द्रौपदी मूर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. अजित पवार यांचे अकाली निधन ही भरून न येणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी त्यांची नेहमी आठवण ठेवली जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, समर्थकांप्रती आणि चाहत्यांप्रती मी मनापासून शोकसंवेदना व्यक्त करते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतर सर्वांच्या कुटुंबीयांनाही हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो. माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे : अमित शहा अजित पवार यांच्या निधनानंतर अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, आज झालेल्या एका दुःखद दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनडीएतील आमचे ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार जी यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले, ते शब्दांत मांडणे कठीण आहे. ते जेव्हा केव्हा भेटायचे, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताशी संबंधित अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन हे एनडीए कुटुंबासाठीच नव्हे, तर माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे. पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकाच्या या कठीण प्रसंगी संपूर्ण एनडीए पवार कुटुंबासोबत ठामपणे उभे आहे. ॐ शांती शांती शांती. “महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस” : देवेंद्र फडणवीस आज सकाळी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. अजित पवार हे संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. मनाला वेदना देणारी अतिशय दुर्दैवी घटना : एकनाथ शिंदे मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. अजितदादा… तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच : चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले की, “अजितदादा… तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच! माझ्यासाठीच नव्हे, तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवच… अजितदादा, खरंच तुम्ही असं जायला नको होतं. महाराष्ट्राला, बारामतीला अजूनही तुमची गरज होती… एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षांपासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये अजितदादांचा पक्षही आला. त्यामुळे अजितदादांना आणखी जवळून पाहता आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं. दादांनी वडिलांची कधीच कमी भासून दिली नाही : धनंजय मुंडे यावेळी त्यांनी बोलताना, “माझे वडील गेल्यानंतर दादांनी कधीच त्याची कमी भासून दिली नाही” असे म्हणत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अजित दादा व धनंजय मुंडे यांचे एक वेगळेच नाते होते. पक्षातील सर्वात लाडका कोण, असे विचारल्यास दादा जाहीरपणे धनंजय मुंडे यांचे नाव घेत असत. त्यामुळे अजित दादांच्या अकाली निधनाचे धनंजय मुंडे यांच्यासाठी दुःख मोठे असल्याचे दिसत आहे. काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात भावूक बाळासाहेब थोरात यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली”. तुमची उणीव कायम भासत राहील दादा : सुबोध भावे इन्स्टाग्रामवर अजित पवारांचा फोटो पोस्ट करत सुबोध भावे यांनी लिहिले, “अजित दादा, महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतात. तुमची काम करण्याची पद्धत, हजरजबाबीपणा आणि सर्वसामान्य माणसाशी त्याच्या भाषेत संवाद साधण्याची कला विशेष होती. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही तुमचं लक्ष असायचं. तुमची उणीव कायम भासत राहील दादा… तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहतील.” अजित दादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत . प्रवासादरम्यान आपल्या एका सहकाऱ्यांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.