Pune : लावणीचा बाज ठेवणे गरजेचे उल्हास पवार यांची अपेक्षा

पुणे : लोककला आणि लोकसंगीत ही आपल्या महाराष्ट्राची समृद्ध परंपरा पुढे घेऊन गेले पाहिजे. या पिढीने नव्या ढंगात लावणी सादर करताना तिचा बाज ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुणे लावणी महोत्सवात उल्हास पवार यांच्या हस्ते नंदा-उमा इस्लामपूरकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार, अश्विनी मुसळे यांना डाॅ. भास्कर खांडगे स्मृती पुरस्कार आणि हसन शेख पाटेवाडीकर यांना बापूसाहेब जिंतीकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर, सुरेश घुले, प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, अध्यक्ष मित्रावरून झांबरे, दीपक वाघमारे, रेश्मा परितेकर या वेळी उपस्थित होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्या हस्ते गरजू कलाकारांना आर्थिक मदत देण्यात आली.
लोककलेच्या माध्यमातून पूर्वी केवळ मनोरंजन नव्हे तर लोकप्रबोधन करण्यात आले होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक शाहिरांनी स्फूर्तीदायी काव्य रचले होते, असे पवार म्हणाले.




