Pune : धुक्याचा फटका, विमान उड्डाणांना उशीर

पुणे : शहरात थंडीमुळे पहाटे दाट धुके पडू लागले आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत पुणे विमानतळावरून होणाऱ्या विमान उड्डाणांना अडचणी येत असून, उड्डाणे उशिराने होत आहे. शनिवारी (दि. २१) दहा विमानांची उड्डाणे उशिराने झाली. परिणामी, प्रवाशांचा खोळंबा झाला.
नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. सध्या पुणे विमानतळावरून दररोज १९० ते १९५ च्या आसपास विमानांची ये-जा होते. तर जवळपास २५ ते ३० हजार प्रवासी संख्या आहे. हिवाळी वेळापत्रकामुळे अलीकडील काळात विमान सेवांमध्ये आणि उड्डाणांच्या स्लॉटमध्ये विमानतळ प्रशासनाने वाढ केली आहेत. त्यामुळे मागील आठवड्यात एक दिवस पुणे विमानतळावरून २०० पर्यंत विमानांची ये-जा झाली.
हिवाळ्यात प्रवासी मोठ्या संख्येने पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे पुणे विमानतळ प्रशासनाने हिवाळी वेळापत्रकानुसार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत, विमान उड्डाणे वाढवली आहेत. शनिवारी विमानांची नियोजित उड्डाणे होती. ही उड्डाणे पहाटे पडलेल्या धुक्यामुळे होऊ शकली नाहीत. त्यांना उशीर झाला, सुमारे १० विमानांची उड्डाणे उशिरा झाली. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.





