Shankar Jagtap: शहरीकरणाला गती देण्यासाठी विविध प्रकल्पांवर भर – आमदार शंकर जगताप
Shankar Jagtap सेवा रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापनासह रोजगारनिर्मितीवर लक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पाणी, वाहतूक, कचरा आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांवर सकारात्मक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा मानस आहे, अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
दैनिक प्रभातच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त आयोजित विशेष संवादात ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड हे दिवसेंदिवस विस्तारत जाणारे शहर आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा तुलनेने मोठा मतदारसंघ असल्याने या भागात शहरीकरणाचा वेग अधिक आहे.
त्यामुळे नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगितले. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील वाहतुकीचा ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रावेत, पुनावळे, मामुर्डी, किवळे आदी परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मागील दोन वर्षांत सुमारे ११० किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातील विविध कामांना सुरुवातही झाली आहे.
महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होती. मात्र, या रस्त्यांची कामे अपेक्षित पद्धतीने होत नसल्याने देहूरोड ते वाकडदरम्यान दोन्ही बाजूंचे सुमारे २६ किलोमीटरचे सेवा रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. या रस्त्यांच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
ताथवडे, पुनावळे आणि रावेत येथील अंडरपासच्या कामांना गती देण्यात येत असून, प्रस्तावित कामांना महिनाभरात सुरुवात करण्याचे नियोजन आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार सुमारे ७० किलोमीटरचे रस्ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. त्यामुळे मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवडला अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पवना धरणातून शहराला होणारा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासोबतच पुनावळे येथे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरात एसटी महामंडळाचा सुसज्ज डेपो उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा व्यवस्थापनासाठी वेस्ट एनर्जी प्रकल्प
शहरात दररोज सुमारे १,६०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. शहरासाठी सध्या एकच डम्पिंग ग्राउंड असल्याने कचरा व्यवस्थापनाचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांत छोटे-छोटे वेस्ट एनर्जी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर तोडगा
शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणावरही अन्याय न करता कायदेशीर पद्धतीने या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल. शासनाने अर्ध्या गुंठ्यासाठीही रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करण्याची योजना आखली आहे. या योजनेची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Pune District : आपला उत्सव – आपली जबाबदारी; उरुळी कांचनमध्ये गणेश मंडळांतून स्वच्छतेचा जागर





