खराडी बायपास चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग?

पुणे : नगर रस्त्यावरील गजबजलेल्या खराडी बायपास चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने या चौकात उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
खराडी चौक येथील वाहतुकीचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे. हे काम स्पेनमधील “ब्लूस्काय’ कंपनीस देण्यात आले आहे.
ही कंपनी अत्याधुनिक कॅमेरे वापरून फिनिक्स मॉल, टाटा गार्डरूम तसेच खराडी बायपास चौकाच्या वाहतुकीचा अभ्यास करून महापालिकेस अहवाल सादर करणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे सर्वेक्षण केले जाईल. खराडी-मुंढवा रस्त्यावर उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग प्रकल्पाचा कच्चा आराखडा मेट्रोच्या मंजुरीसाठीही पाठविण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत या प्रकल्पाची निविदा काढली जाणार, असे सांगितले जात होते. पण, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पेनमधील कंपनीकडून या चौकात अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी लिडार कॅमेरा वापरून या चौकाचा
अभ्यास करणार आहे. यामध्ये फिनिक्स मॉल, टाटागार्ड रूम आणि खराडी चौक येथे हे कॅमेरे लावले जाणार आहेत.
सलग सात दिवस या रस्त्यावर सर्व बाजूने येणारी वाहतूक, पादचाऱ्यांचे निरीक्षण केले जाईल. त्यानुसार त्याचा अहवाल तयार करून तो महापालिकेला सादर केला जाणार आहे. या अभ्यासातून या चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्गाची गरज आहे का? असेल तर तो कशा पद्धतीने बांधला हे निश्चित केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. महापालिकेकडून अशा प्रकारचे सर्वेक्षण पहिल्यांदाच केले जात असून त्याची प्रत्यक्षात उपयुक्तता लक्षात घेऊन भविष्यात अशा कामांसाठी ही यंत्रणा वापरता येईल का? याचा निर्णयही या अभ्यासानंतर घेतला जाणार आहे.





