Morwa Airport : मोरवा विमानतळावरून फ्लाईंग क्लबचे टेकऑफ; 25 ते 27 डिसेंबरपर्यत होणार फ्लाईंग टेस्टिंग

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावरून २०२५ या नव्या वर्षात फ्लाईंग क्लबचे टेकऑफ होणार हे स्पष्ट झाले आहे. येत्या २५ ते २७ डिसेंबरपर्यत तेथील धावपट्टीवरून फ्लाईंग टेस्टिंग होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. जानेवारी २०२५ च्या शेवटी विमानोड्डाण पूर्ण क्षमतेने सुरू होईल असे आयुक्तांनी सांगितले.
नागपूर विमानतळ व्यस्त विमानतळांपैकी एक असल्याने येथे विमानोड्डाणासाठी तासही मिळणे दुरापास्त झाले आहे. नागपूर विमानतळावर तसेही नवीन धावपट्टीचे काम सुरू आहे. त्यामुळे मार्च २०२५ पर्यंत नोटॅम जाहीर केले आहे. नोटॅम अर्थात नोटीस टू एअर मिशन सिस्टिम’च्या माध्यमातून वैमानिकांना हवामान, ज्वालामुखी, संभाव्य धोके, विमानतळावरील परिस्थिती, लष्करी कारवाई याबाबत अद्ययावत, संवेदनशील माहिती वेळेत पुरविली जाते.
मोरवा विमानतळावरून उड्डाण करण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिविल एविएशनच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहे. तिथे चार सेसना विमाने ठेवता येईल असे तात्पुरते हँगरही उभारण्यात आले आहे. डीजीसीएने दाखवलेली पूर्तता करण्यात आली आहे. येत्या २५ ते २७ डिसेंबर दरम्यान माेरवाच्या धावपट्टीवरून विमानोड्डाणाचा सराव करण्यात येईल असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
१९९० मध्ये महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतल्यानंतर क्लब सलगपणे सुरळीत सुरू न राहिल्यामुळे अनेक अडथळे आले. १९९० मध्ये राज्य सरकारने क्लब ताब्यात घेऊन परत सुरू केला. १९९४ पर्यत क्लब सुरळीत सुरू होता. त्या नंतर काही कारणाने बंद पडलेला क्लब २००६ मध्ये राज्य सरकारने परत पुनर्जीवीत केला.





