लखनऊच्या विमानतळावर फ्लोरिन वायूची गळती

Lucknow airport । लखनऊच्या विमानतळावर फ्लोरिन वायूची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. लखनऊच्या सरोजिनीनगर विमानतळाच्या कार्गो विभागात गॅस गळती झाल्याने विमानतळावर चेंगराचेंगरीसारखे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळावरून लोकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. या घटनेत विमानतळ कर्मचारी बेशुद्ध झाल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस दल आणि अग्निशमन दल तेथे पोहोचले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. विमानतळाच्या कार्गो क्षेत्रापासून सर्व लोकांना दूर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘विमानतळाच्या आतील 1.5 किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात येत आहे. लखनऊ विमानतळावरील या घटनेनंतर सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. हा वायू वैद्यकीय क्षेत्रात वापरला जातो.’
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘विमानतळ टर्मिनल 3 च्या कार्गो एरियामध्ये फ्लोअरिंग लीकेजची नोंद झाली होती. अग्निशमन सेवा, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी हजर आहे. तिन्ही टीम एकत्र काम करत आहेत. काही औषधांच्या पॅकेजिंगमधून फ्लोरिनची गळती झाली, ज्याचा शोध घेतला जात आहे.
गॅस गळतीची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. गळती झालेला फ्लोरिन वायू कर्करोगाच्या उपचारात वापरला जातो. कर्करोगाच्या रुग्णांना रेडिओथेरपी देण्यासाठी फ्लोरिनचा वापर केला जातो. विमानतळाच्या कार्गो विभागात दररोज फ्लोरिनची वाहतूक सुरू असते. एका शहरातून दुसऱ्या शहरात मालवाहतूक करून पाठवले जाते.
शनिवारीही फ्लोरीन पाठवले जाणार होते. गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाने ते एका डब्यात पाठवायचे होते. जेव्हा बॉक्स चेकिंग मशिनमधून गेला तेव्हा तो जास्त वजनाचा असल्याने तो सापडला आणि अलार्म वाजू लागला. तपासण्यासाठी बॉक्स उघडण्यात आल्याने गॅस गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या विमानतळावरील परिस्थिती पूर्णपणे सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

