वातावरणात चढउतारामुळे रुग्ण धास्तावले; तिसरी लाट रोखण्याचे आरोग्य विभागापुढे आव्हान

सोमेश्वरनगर – सर्वत्रच सध्या थंडीची लाट आठ दिवसांपासून वाढत चालल्यामुळे लहान मोठ्यासह चिमुकल्यांनाही सर्दी, पडसे, घशाचे विकार व थंडी तापाच्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यातील गावोगावी झपाट्याने वाढ होत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पुन्हा एकदा सतर्क राहावे लागेल. वातावरणातील चढउतारामुळे सर्वत्र रुग्ण धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे करोनाची तिसरी लाट सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तशा प्रकारच्या सूचना देखील प्रसारमाध्यमांमधून होताना दिसत आहेत. त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे तालुक्यातील आजची असणारी करोना रुग्णसंख्या 224वर ठेपलेली शहर 165 तर ग्रामीण 59 अशी आहे. त्यामुळे अनेक जण सर्दी, पडसे, थंडी, ताप इत्यादिंची लक्षणे दिसताच प्रथम खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये धाव घेताना दिसत आहेत. या लक्षणांमुळे निश्चितच सर्वत्रच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. आता आरोग्य विभागाला देखील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ताणतणाव येणार आहे. अनेक रुग्णांनी सरकारी रुग्णालयांमध्ये नाक व घशाचे नमुने तपासणीसाठी धाव घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मागील महिन्यात थंडीची सौम्य लाट होती. ती आता गेल्या आठ दिवसांपासून पासून उच्चांकच गाठताना दिसते. त्याचा शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होताना दिसतो. पहाटे पहाटे दुःखे पडणे, ढगाळ वातावरण तयार होणे, सूर्यदर्शन न होणे झाले तर ते अति तीव्र असणे यामुळे लहान बालक व वृद्धांना या वातावरणाचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षापासून करोना या आजाराने संपूर्ण जग भयभीत झाले आहे.
या करोनाच्या लाटेमध्ये अनेकांचा निष्पाप बळी जाऊन अनेक कुटुंब उघडी पडल्याचे सर्वांनी पाहिले. आता तर पुन्हा तिसऱ्या लाटेची पुन्हा सुरुवात झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये करोना कालावधीत बारामती तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे रात्रंदिवस कामगिरी बजावली. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जीवाची तमा न बाळगता आपले कार्य केले आहे. त्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली गेली
सध्या तिसऱ्या लाटेची सौम्या लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्रामार्फत तपासणी करावी. नागरिकांनी लसीकरण करून घेणे महत्वाचे असून दुसरा डोस पूर्ण करून घेणे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे हे महत्त्वाचे आहे.
-डॉ. मनोज खोमणे, बारामती तालुका आरोग्य अधिकारी





