पुणे | “साबरमती’चे अनुकरण केल्याने पुण्यात पूरस्थिती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुजरातमधील साबरमती प्रकल्पाचे अनुकरण पुण्यातील पूरस्थितीला जबाबदार आहे. त्यामुळे मुठा नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पुण्यातील पुराच्या पार्श्वभूमीवरठाकरे यांनी सिंहगड रस्त्यावरील पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तत्पूर्वी ठाकरे यांनी तज्ज्ञांमार्फत बनवलेल्या मुठा नदीवरील अतिक्रमणे, नदीसुधार प्रकल्प आणि पूर या संदर्भात सादरीकरण केले. गुजरातमधील साबरमती नदी, तेथील भौगोलिक रचना, नदीचा उतार, प्रवाह, वहन तसेच मुठेची वैशिष्टय़े यात भिन्नता आहे. मात्र, या बाबी नदी सुधार प्रकल्पामध्ये लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत.
वास्तविक नदीचे पात्र रुंद आणि खोल करण्याऐवजी पुण्यात ते अरुंद करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. नदीत राडारोडा आणि क्राँक्रिटिकरण केले गेले, असे ठाकरे म्हणाले. रेड लाइन, ब्ल्यू लइनही काही बांधकामांसाठी बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नदी पात्रात बांधकामे झाली असून, गुजरातच्या एका लाडक्या ऑर्किटेक्टसाठी नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. हे सर्व घटक पुण्याच्या पुराला जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
शहर नियोजनाचा प्रश्न मोठा
देशात सर्वच शहरांमध्ये आज नियोजनाचा प्रश्न उभा आहे. विकास आणि विनाश यातला फरकच आपलेला समजेनासा झाला आहे. देशाच्या विकासाबाबत बोलताना आपण अगदी ५०-६० वर्षे मागे जातो. आधीच्या लोकांनी काय केले, असे सवाल उपस्थित करतो. मात्र, पुढच्या ५० दिवसांचाही विचार करायला आपण तयार नाही, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.





