पाटणा/ प्रयागराज – महाकुंभातील पाचवे मोठे स्नान उद्या म्हणजे बुधवारी आहे. माघ पौर्णिमेला संगमात धार्मिक स्नान करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. गेल्या तीन दिवसांत महाकुंभात येणाऱ्या भाविकांची गर्दी इतकी वाढली आहे की संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. संगमावर पोहोचण्यासाठी भाविकांना अनेक किलोमीटर चालावे लागते आहे. रस्त्यापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत सर्वत्र श्रद्धेचा पूर दिसत असून महाकुंभात स्नान केल्यानंतर, भाविक काशी आणि अयोध्येतही पोहोचत आहेत. अशा परिस्थितीत तिथेही मोठी गर्दी दिसून येते आहे. आजही प्रयागराजला पोहोचण्यासाठी बिहारमधील पाटणा रेल्वे स्थानकावर भाविकांची मोठी गर्दी जमली. लाखो भाविक महाकुंभाला जाण्यासाठी पाटणा स्टेशनवर पोहोचले आहेत. ट्रेनमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांनी कोचच्या काचाही फोडल्या. गर्दीमुळे एसी कोचचे दरवाजे बंद आहेत, ज्यामुळे लोक संतापले होते. ब्रह्मपुत्र एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी काही लोकांनी गेटची काच फोडली. सध्या पाटणा स्टेशनवर इतकी गर्दी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही. अनेक लोकांच्या गाड्या चुकल्या आहेत. गाड्यांवर दगडफेक – सध्या बिहारमधील बहुतेक शहरांमधील रेल्वे स्थानकांची हीच अवस्था आहे. सर्वत्र रेल्वे स्थानके पूर्णपणे भरलेल्या आहेत. मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकही महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांनी गजबजलेले आहे. अनेकांना ट्रेनमध्ये चढण्याची संधीही मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे. बसस्थानके आणि रेल्वे स्थानके गर्दीने तुडूंब भरली आहेत. अशा परिस्थितीत लोकांचा रागही तीव्रपणे उफाळून येत आहे. जयनगरहून नवी दिल्लीला जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी सुपरफास्ट एक्सप्रेसवर समस्तीपूर स्थानकावर दगडफेक करण्यात आली. स्टेशनवर महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी होती. लोक एसी कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रवाशांनी आतून गेट बंद केले होते. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर गोंधळ घातला. यावेळी दगडफेकही झाली. यामुळे सुमारे १२ एसी कोचच्या काचा फुटल्या. काही प्रवाशांना किरकोळ दुखापतही झाली. महाकुंभात स्नान करण्यासाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत १६४ गाड्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात ८.६१ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी ३३४ गाड्या चालवण्यात आल्या, ज्यामध्ये १४.४० लाखांहून अधिक लोकांनी प्रवास केला.