IAF Plane Crash : “आई आत्ता घाईत आहे, मोकळा झाल्यावर बोलतो…”, हे शब्द ठरले अखेरचे, विमान अपघातात फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार शहीद
IAF Plane Crash :

IAF Plane Crash : “आत्ता घाईत आहे, मोकळा झाल्यावर बोलतो…” आईशी व्हिडीओ कॉलवर बोलताना उच्चारलेले हे शब्दच फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार यांचे अखेरचे ठरले.
त्यानंतर अवघ्या तासाभरात आसाममधील जोरहाट येथे भारतीय वायुसेनेच्या एएन-३२ विमानाच्या भीषण अपघातात ते शहीद झाले. या घटनेने बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हुलासगंज प्रखंडातील बनवारिया गावचे रहिवासी असलेले २६ वर्षीय शुभम कुमार यांनी शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजता आपल्या आईशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला होता.
ते आनंदी दिसत होते; मात्र घाईत असल्याने “नंतर निवांत बोलू,” एवढेच सांगून त्यांनी संभाषण संपवले. नियतीने मात्र त्यांना पुन्हा बोलण्याची संधीच दिली नाही.
लँडिंगदरम्यान एएन-३२ विमानाचा अपघात –
शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जोरहाट वायुसेना तळावर लँडिंगदरम्यान एएन-३२ विमानाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते धावपट्टीवरून घसरले दोन तुकड्यांत विभागले गेले आणि त्याला आग लागली.
या दुर्घटनेत फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार यांच्यासह पाच जवान शहीद झाले, तर सहवैमानिक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय वायुसेनेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
The Indian Air Force deeply regrets the loss of five personnel in the An-32 accident at Jorhat, Assam.
Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty.… pic.twitter.com/9SmOjtS5mU
— Indian Air Force (@IAF_MCC) June 13, 2026
२०२१ मध्ये भारतीय वायुसेनेत प्रवेश –
शुभम यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भाऊ सत्यम यांनी सांगितले की, सुरुवातीला ही अफवा असावी असे वाटले; मात्र शुभम यांच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर दुर्घटनेची अधिकृत माहिती मिळाली. त्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली.
शेतकरी वडील अमरेंद्र आनंद आणि गृहिणी आई यांची अवस्था अत्यंत बिकट असून, वडील बोलण्याच्याही स्थितीत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. २०२१ मध्ये शुभम यांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश केला होता. आपल्या मुलाच्या यशाचा कुटुंबाला मोठा अभिमान होता.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी त्यांच्या विवाहाची स्वप्ने पाहिली होती. मात्र शुभम स्वतः विवाहास नकार देत होते. काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. घरातून झालेला तोच त्यांचा अखेरचा निरोप ठरला.
या दुर्घटनेबद्दल बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “जोरहाट येथील एएन-३२ विमान दुर्घटनेत पाच वीर वायुसैनिकांचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या अदम्य शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचे योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

