Pimpri News: कोटीचा फ्लॅट अन पाण्यासाठी वणवण; शहरातील ३४ सोसायट्यांना ५० टक्केच पाणी
Pimpri News: टँकरवर रहिवाशांची भिस्त

पिंपरी – शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पाणीसाठा अपुरा पडत असल्याने वाकड परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वाकडमधील सुमारे ३४ गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवश्यकतेच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सोसायट्यांमध्ये प्रत्येकी सुमारे २०० ते ५०० सदनिका आहेत. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा भरून काढण्यासाठी रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
वाकड परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. लगत आयटी पार्क, मुंबईची कनेक्टिव्हिटी यामुळे याठिकाणी फ्लॅटच्या किंमती कोटीच्या घरात आहेत. टोलेजंग इमारती, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि वाढती लोकसंख्या यामुळे या भागातील पाण्याची मागणी देखील झपाट्याने वाढली आहे. मात्र, त्याप्रमाणात महापालिकेच्या पाणीपुरवठ्याची क्षमता वाढलेली नसल्याने अनेक सोसायट्यांना नियमित पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
या ३४ सोसायट्यांना आवश्यक असलेल्या पाण्याच्या तुलनेत सध्या केवळ निम्माच पुरवठा होत असल्याने उर्वरित गरज भागविण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची मागणी आणखी वाढल्यास टँकरची संख्या आणि त्यावरील खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी सोसायटीधारकांकडून होत आहे.
वाकडमधील या सोसायट्यांना शंभर टक्के पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे रहिवाशांकडून मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या उपलब्ध पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण असल्याने तातडीने पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्य नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भामा-आसखेड प्रकल्पाचे पाणी शहराला उपलब्ध झाल्यानंतरच या भागातील पाणीपुरवठ्यात वाढ करणे शक्य होईल, अशी भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. त्यामुळे भामा-आसखेडचे पाणी वाकडमधील या सोसायट्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसंख्या वाढली, पाण्याची व्यवस्था अपुरी
वाकडसह पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. हजारो नवीन सदनिका निर्माण झाल्याने या भागातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची पायाभूत व्यवस्था पुरेशी सक्षम झाली आहे का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
विकसकांनी ही हात झटकले
नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देताना भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत अनेक विकसकांना स्वतः पाणीपुरवठा करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक विकसक इमारतीचे काम पूर्ण होऊन सोसायटी झाल्यावर पाणी पुरवत नाही. महापालिका माणुसकीच्या दृष्टीकोनातून या रहिवाशांना पाणी पुरवत आहे.
टँकरचा खर्च रहिवाशांच्या माथी
महापालिकेकडून मिळणारे पाणी अपुरे असल्याने सोसायट्यांना नियमितपणे टँकर मागवावे लागतात. त्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च अखेर रहिवाशांकडूनच सोसायटीच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे महापालिकेचा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यातून निर्माण होणारा टँकरचा आर्थिक भार अशी दुहेरी झळ रहिवाशांना सहन करावी लागत आहे.
‘वाकड भागातील सोसायट्यांना आपण पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देत आहोत. सध्या शहरात १० टक्के पाणी कपात सुरू झाल्याने ६५ एमएलडी पाण्याची तूट निर्माण होणार आहे. मात्र, आधीच आपल्याकडे सुमारे १५० एमएलडी पाण्याची तूट आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन केले आहे.’- अजय सुर्यवंशी, सह शहर अभियंता.
Pune District : जुन्नर तालुक्यात नवे समीकरण?





