पाण्याखाली ध्वजसंचलन अन् ध्वजवंदन

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी मुंबईतील उरण येथे एक अफलातून सोहळा पार पडणार आहे. नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोज हे पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर करणार आहेत.
उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी आणि माजी मरीन कमांडो रवी कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकारला जात आहे. रविवारी (दि.14) आणि सोमवारी (दि.15) रात्री 12:01 मिनिटांनी हा विश्वविक्रमी कार्यक्रम होणार असून सुमारे 10 कमांडो अर्धा तास पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृतोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करतील.
या शानदार सोहळ्यास जगभरातील मिडीया प्रतिनिधींसह सुमारे तीन हजार प्रेक्षक जमिनीवरील स्क्रीनवर पाण्याखालील अद्भूत सोहळा अनुभवणार आहेत. आमदार महेश बालदी आणि रवी कुलकर्णी म्हणाले की, उरण मधील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल मध्ये का कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाण्याखाली अर्धा तास राहणाऱ्या भारतीय नौदलातील निवृत्त कमांडोंसाठी खास बनविण्यात आलेले हेल्मेट असतील, त्याचप्रमाणे स्कुबा डायव्हिंग सेट्सचाही वापर करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा असेल.
या सोहळ्यामध्ये रवि कुलकर्णी यांच्याबरोबरच कमांडर प्रवीण तुळपुळे, एन.सी. जगजीवन, रामदास कळसे, विनोद कुमार, विलास भगत, रामेश्वर यादव, सज्जन सिंग, एन.एल.यादव, अनिल घाडगे, भूपेंद्र सिंग हे सहभागी होणार आहेत. या अनोख्या आणि अफलातून कार्यक्रमाचा लाभ प्रत्यक्ष तसेच दूरचित्रवाणीवरून घ्यावा, असे आवाहन आयोजक आमदार महेश बालदी यांनी केले आहे.





