पुणे | चिमुकलीच्या लैंगिक छळ प्रकरणी बसचालकास पाच वर्षे सक्तमजुरी ; न्यायालयाचा निकाल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शालेय बसप्रवासादरम्यान आठ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग करत लैगिंक छळ करणार्या विकास बाळू तिकोणे या बसचालकास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही वडगाव मावळचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी निकालात नमूद केले आहे.
ही घटना १६ ऑगस्ट २०१८ रोजी उघडकीस आली. घटनेच्या दिवशी पीडितेची आई शाळेच्या बसची वाट पाहात होती. बस नजरेस पडल्यानंतर चालकाच्या जागी दुसराच कोणी असल्याचे तिच्या निदर्शास आले. त्या वेळी पीडिता व आरोपी बसच्या मागील सीटवर बसल्याचे आईला दिसले.
बस थांबल्यानंतर घाबरलेल्या पीडितेला घेऊन आई घरी आली. त्या वेळी तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिकोणे याने केलेल्या कृत्याची माहिती पीडितेने पालकांना दिली. कोणाला काही सांगितल्यास मारण्यासह शाळेत न सोडण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली व दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित, तिची आई, दुसरा चालक, वैद्यकीय अधिकारी व पंच साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस हवालदार व्ही. एम. सपकाळ यांनी न्यायालयीन कामकाजात सरकार पक्षास मदत केली.





