जांबुत : पिंपरखेड (ता.शिरूर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे या चिमुकलीचा मृत्यू झाल्यावर बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून घटनास्थळ परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक पाच वर्षाची बिबट मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. नरभक्षक बिबट मोकाटच असण्याची शक्यता लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून या परिसरात तब्बल १० पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंपरखेड येथे रविवारी (दि. १२) रोजी भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने पिंपरखेड आणि परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक होत बेल्हे जेजुरी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी घटनास्थळ परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दहा पिंजरे लावून पिंजऱ्यात भक्ष्य ठेवले होते. घटनास्थळा जवळच लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात सोमवारी (दि.१३ ) पहाटेच्या सुमारास एक बिबट्या कैद झाला. वनविभागाकडून पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे. माणिकडोह येथील डॉक्टरांनी सदर बिबटची तपासणी केली असून ती पाच वर्षे वयाची मादी असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.