जनगणनेसाठी पाच हजार शिक्षक

आठ क्षेत्रीय अधिकारी; ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने होणार सर्वेक्षण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात जनगणना 2021 चे कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल 5 हजार प्रगणक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे प्रगणक घरोघरी जाऊन कुटुंबाची संपूर्ण माहिती घेणार आहेत. ही माहिती मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन भरून घेतली जाणार आहे.
या गणनेसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर हे प्रधान जनगणना अधिकारी व अतिरिक्त आयुक्त अजित पवार हे शहर जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर, 8 क्षेत्रीय अधिकारी हे चार्ज अधिकारी असणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयानुसार हे कामकाज केले जाणार आहे. या संदर्भातील पाच दिवसांचे मास्टर प्रशिक्षण सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर व अण्णा बोदाडे यांनी नुकतेच यशदा येथे पूर्ण केले आहे.
शहराची जनगणना करण्यासाठी एकूण 61 फिल्ड ट्रेनरची नियुक्ती केली जाणार आहे. हे ट्रेनर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अंतिम यादी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यासाठी महापालिका व खासगी शाळेचे तब्बल 5 हजार शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यापूर्वी गटनिहाय घरांची यादी तयार केली जाणार आहे. हे काम 1 मे ते 15 जून या कालावधीत केले जाणार आहे. लवकरच प्रगणकांची यादी अंतिम करून त्यांना टप्पाटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्वेक्षण ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन पद्धतीने केले जाणार आहे. केंद्राने विकसित केलेल्या मोबाईल ऍपवरच सर्व माहिती संकलित करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
अशी घेणार प्रगणक माहिती
घर कसे आहे. त्याचे छत कोणत्या प्रकारचे आहे. घरात शौचालय, स्वयंपाकघर व स्नानगृह आहे का, स्वयंपाक घरात गॅस की चुलीचा वापर होतो. पाण्याची काय व्यवस्था आहे. टीव्ही, सायकल, दुचाकी, तीनचाकी व मोटार आहे का, कुटुंबात किती सदस्य आहेत? जात कोणती आहे, त्यांचे वय आणि लिंग, शिक्षण किती झाले. घर, जागा व शेतजमीन मालकीचे आहे का, आदी सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. एका कुटुंबाची माहिती घेण्यासाठी किमान 30 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.





