पुणे | पालखी सोहळ्यासाठी पुण्यात पाच हजार पोलीस तैनात
पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (दि.३०) शहरात दाखल होणार आहे. या सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होते.
या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत.
नाना पेठेतील श्री निवडु्ंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आणखी करण्यात आली आहे.
विशेषतः मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा फौजफाटा असेल. ठिकठिकाणी वॉच टॉवर, सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यामाध्यमातून पालख्यांच्या आगमनापासून पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
…दृष्टीक्षेपात पालखी सोहळा बंदोबस्त
अपर पोलीस आयुक्त – २
पोलीस उपायुक्त – १०
सहायक पोलीस आयुक्त – २०
पोलीस निरीक्षक- १०१
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक – ३४३
पोलीस कर्मचारी – ३ हजार ६९३
होमगार्ड – ८००
साध्या वेशात गुन्हे शाखेची पथके
पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यासाठी गुन्हे शाखेतील खास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.





